Gajanan Maharaj

Gajanan Maharaj
Shri Gajanan Maharaj

Tuesday, July 7, 2009

Shri Gajanan Maharaj ki Jay !!!

आधुनिक महाराष्ट्रातील एक संत. २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जि. बुलढाणा येथे दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति | आलीसे प्रचिती बहुतांना ||" बंकटलाल आगरवाल ह्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. असे सांगितले जाते की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सदुगुरु होते. त्यांच्याच मार्गदर्शनाबरहुकूम महाराजांनी नाशिकजवळील कपिलधारा तीर्थाजवळील घनघोर जंगलात बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली व परमोच्च स्थितिस प्राप्त झाले. महाराज कोण होते, कोठून आले, ब्राह्मण होते (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करित, तसेच वेदश्रवणदेखिल त्यांना फार आवडे) किंवा नव्हते ह्या गोष्टींवर बराच वाद चालतो; पण तो खरोखर व्यर्थ आहे. ते अवतारी पुरुष होते, हे मात्र वादातित आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणे बुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. म्हणूनच की काय आज महाराष्ट्रभर त्यांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देतात असे व्यवस्थित सांगितले आहे. देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करुन खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुध्द ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे. तेथून ते वेगाने निघून् गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागल्याने महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. तेथे त्यांनी गोविंद्पंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभर्‍या कीर्तनकर होऊ नये. गावातील वयोवृध्द जानराव देशमुख मरणोन्मुख असताना महाराजांच्या चरणतीर्थाने ते बरे झाले, ह्या विषयी दासगणू म्हणतात, "जानराव देशमुख झालासे आजारी | मृत्युशय्येवरी पडला होता | समर्थांचे तीर्थ तयासी पाजिता | दूर झाली व्यथा गणू म्हणे ||" अश्रध्द अशा भास्कर पाटलाला कोरड्या विहिरीत जिवंत झरा उत्पन्न करुन दाखवून् त्याच्या मनात भगवंताविषयी श्रध्दा निर्माण केली. महाराज हे परमोच्च कोटीतील श्रेष्ठ असे परमहंस संन्यासी असल्याकारणाने त्यांनी बंकटलालचे घर सोडले आणि मारुतीच्या मंदिरात वस्ति केली. पाटीलबंधुंचा राकटपणा तसेच आडदांडपणा त्यांनी दूर् करून त्यांना भक्तिमार्गाला लाविले; खंडू पाटलाला मुलगा दिला. गर्व हरण झाल्यानंतर हरी पाटील हा महाराजांचा एक श्रेष्ठ भक्त झाला. तसूभरही आत्मज्ञान नसलेल्या दांभिक ब्रह्मगिरी गोसाव्याला, जळत्या पलंगावर ज्वालांमध्ये शांतपणे बसून "नैनं छिंदंति शस्त्राणि,नैनं दहति पावकः.." ह्या श्री भगवद्गीतेलील श्लोक सोदाहरण पटवून दिला. बाळापुरच्या रामदासी पंथातील बाळकृष्णबुवाला दासनवमीच्या दिवशी त्याच्या घरी श्रीरामदास स्वामींच्या रुपात दर्शन दिले आणि दोघांमधिल अद्वैत दाखवून दिले. जरी कारंजाच्या लक्ष्मण घुडेची पोटदुखी बरी केली तरीदेखिल त्याचा दांभिकपणा मात्र चालवून घेतला नाही. बच्चुलाल अग्रवालाची पूजा स्वीकरली परंतु त्याच्या संपत्तीचे प्रदर्शन खपवून घेतले नाही; ह्यातच त्यांचे वैराग्य दिसून् येते. जेव्हा बाळापुरातील रामदासी बाळकृष्णबुवाच्या दासनवमीच्या उत्सवाला पुढच्या वर्षी महाराज भक्तांसह आले त्यावेळी भास्कराला पिसाळलेला कुत्रा चावला. त्यावेळी महाराजांनी त्याला पिसाळू न देता वाचविले आणि जन्म मरणाचे रहस्य, पुनर्जन्मांचे कारण हे स‍‍र्व विषद करुन सांगितले. त्यावर दोन महिन्यांनी त्यांनी भास्कराला वैकुंठी पाठविले आणि त्याला स्वहस्ते अडगाव अकोलीच्या मध्ये द्वारकेश्वराजवळ समाधि दिली. मुंबईचा बाळाभाऊ मामाला भेटायला बाळापुरी आला आणि महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा कायमचाच श्रेष्ठ भ़क्त होऊन गेला. महाराजांनी स्वहस्ते त्याला आपल्या आसनी बसवून, त्याला मठाचा उत्तराधिकारी नेमून मगच समाधि घेतली. महाराजांचा विरह सहन न होऊन, त्यांच्या समाधिनंतर दोन वर्षात खंगून बाळाभाऊ हे जग सोडून गेले. हे सदगुरुभक्तिचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण होय. ज्या विहिरीत सुरुंगाचे स्फोट होत होते, त्यातच महाराजांचा भक्त गणु जवरी अडकला होता, परंतु महाराजांच्या कृपेमुळे त्याच्या हाती ऐन वेळेला एक कपार आली, त्यात दडून बसताच, एक मोठा धोंडा झाकणाप्रमाणे त्यावर येऊन पडल्यामुळे त्याच्या प्राणांचे संरक्षण झाले. पीतांबर नावाचा महाराजांचा एक भोळा भाविक भक्त होता. महाराजांनी दिलेला शेला त्याने नेसला, एवढ्याच कारणाने शिष्यांमध्ये तेढ माजली, म्हणून महाराजांनी त्याला देशाटनाला जाऊन भोळ्या भाविकांना तारण्याची आज्ञा दिली. व्यथित मनाने पीतांबर हिंडत हिंडत कोंडोलीला आला आणि वठलेल्या आंब्याच्या झाडावर बसला. तेथे त्याने लोकाग्रहामुळे आणि महाराजांच्या कृपेमुळे वठलेल्या आंव्याच्या वृक्षाला क्षणार्धात पाने आणवली. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचे महिमान सर्वदूर पसरले. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करु लागले. महारोगाने त्रासलेला, समाजाने तिरस्करिलला उपेक्षित असा सवदडचा गंगाभारती गोसावी महाराजांच्या थुंकीतल्या बेडक्याने रोगमुक्त होऊन महाराजांच्या आज्ञेने पुढे मलकापुरला जनकल्याणार्थ गेला. शेगावची वारी करण्यास मुंडगावाहून निघालेला, तापाने फणफणलेला आणि काखेतील प्लेगाच्या गाठीने हैराण झालेल्या पुंडलिक भोकरेची गाठ महाराजांनी क्षणार्धात नाहीशी करुन त्याला रोगमुक्त केले.पुंडलिकाला भविष्य जाणण्याची शक्ति महाराजांनी दिली होती. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने बंकटलाल, मारुती, चंद्रभान, बजरंगलाल ह्यांनी नर्मदास्नानाकरिता महाराजांना त्यांच्या मनाविरुध ओंकारेश्वराला नेले असता, नावेतून परतीचा प्रवास करताना नदीच्या मध्यावर नाव फुटली आणि नर्मदा नदीत बुडून मरण्याचा घोर प्रसंग आला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः नर्मदा नदीने स्त्रीरुपात येऊन नाव काठाला आणली व सर्वांचे रक्षण केले. त्यावेळी नर्मदा नदीने, "मी ओंकार कोळ्याची कन्यका | माझे नाव नर्मदा देखा ||" असा स्वतःचा परिचय दिला. "नाव फुटल्याचे करुनी आमीष | नर्मदा सेवेस प्रकटली | गणुदास म्हणे लावूनिया हात | पैलतटाप्रत नेली नौका ||" असे दासगणुंनी वर्णन केले आहे. असे अगम्य, अतर्क्य असे चमत्कार फक्त महाराजच करु जाणे. जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून् त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. श्रीधर गोविंद काळेला परदेशी जाण्यापासून परावृत्त केले, त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. अकोल्याचा त्र्यंबक उर्फ भाऊ कवर हा महाराजांचा परम भक्त होता; तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करुन घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, आंबाड्याची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेऊन घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगावच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||." त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक् भक्तच करु शकेल. इतर भक्त म्हणाले, "भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे|." जेव्हा मंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसर्‍या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसर्‍या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैत सिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधिच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही. परंतु त्यांनी स्वतःच्या अलौकिक शक्तिने सदैव भक्तोध्दार केला हे नि:संशय! अनेक उपचार करुनदेखिल बरा न झालेला मरणयातना देणारा भाऊ कवराचा फोड महाराजांच्या अंगार्‍याने बरा झाला. मुंडगावच्या बायजा माळणीचे लग्न एका नपुंसकाशी झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले. परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तित उर्वरित आयुष घालविले. तिच्यावर आलेले चारित्रहननाचे बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तिचा आणि पावित्र्याचा गौरव केला. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला पंढ‍रीला गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशिर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात, "संत आणि भगवंत | एकरुप साक्षात | गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे?||." मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादुरच्या वारकर्‍याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे म्हणजेच देवभक्ति करणे असे समजणार्‍या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला त्याच्या समोर जीवंत करुन, त्याचा कर्माभिमान गलीत केला. दासगणू म्हणतात, "समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||." श्रीमंत गोपाळराव बुटी हे नागपुरचा कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपुरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलीशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उध्दार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोध्दार करित. शेवटी मनगटाच्या बळावर हरी पाटलांनी त्यांना परत शेगावी आणले. धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. "श्रीवासूदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति | ऐशा जगमान्य विभूति | आल्या आपल्या दर्शना ||," असे दासगणूंनी सार्थच म्हंटले आहे. "तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे?" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतिंची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले, "जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरुर मला ||." महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात, "कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत | तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||." जेव्हा महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तिची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राणा अनंतात विलिन केले.

त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक योगी होते. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करु नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||." याव‍रुन महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले, "दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||." देह त्यागून महाराज ब्रह्मिभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत, ज्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

श्री गजानन विजय या ग्रंथामधे त्यांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. त्याचे भक्तिभावाने पारायण केल्यास इच्छित मनोरथ पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे.